गंगाखेड: शहरातील ६० वर्षीय कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कात आल्याने अनेकांना कोरोना विषाणूंची बाधा झाल्याचे समोर येत आहे. महिलेच्या घरातील काही सदस्य आणि कुटुंबियांच्यावतीने आयोजीत स्वागत समारंभाला उपस्थित अनेकजण कोरोनाबाधित आढळत आहेत. यामुळे येथे आरोग्य विभागाने रॅपिड टेस्ट घेण्यात येत आहेत. यात आज १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ग्रामीण भागातही बाधित आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गंगाखेड शहरात आयोजीत प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या मुलाच्या स्वागत समारंभाला उपस्थिती दर्शविणाऱ्या अनेक व्यापारी व त्यांच्या कुटुंबाला कोरोनाची बाधा झाली आहे. सोमवारी शहरात ३४ रॅपिड अँटीजेंट टेस्ट घेण्यात आल्या. यात कमल चित्र मंदिर परिसरातील ४९ वर्षीय वरिष्ठ बँक अधिकारी, भोई गल्ली परिसरातील ४९ वर्षीय महिला, गुलजार कॉलनीतील ५५ वर्षीय पुरुष, कौडगाव येथील २२ वर्षीय पुरुष असे तीन बँक कर्मचारी व हटकर गल्ली परिसरातील ४४ वर्षीय पुरूष, डॉ. आंबेडकर नगर २३ वर्षीय पुरुष, देवळे जिनिंग २० वर्षीय युवक, ममता कॉलनीतील ४३ वर्षीय पुरुष, शिवशाही कॉलनीतील ५५ वर्षीय पुरुष व ईसाद येथील ३४ वर्षीय पुरुष अशा एकूण १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
शहरात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या कोरोना विषाणूंने सोमवार रोजी ग्रामीण भागातील कौडगाव व ईसाद या गावांत शिरकाव केल्याने गंगाखेड तालुक्यातील कोरोना बाधीतांचा आकडा ६८ वर पोहचला आहे. रॅपिड टेस्टच्या अँटीजेंट किट संपल्याने सोमवार रोजी हायरिस्क असलेल्या ६२ जणांचे स्वब घेऊन प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे यांनी दिली आहे.