- ज्ञानेश्वर रोकडेजिंतूर : तालुक्यातील अकोली येथे शासकीय निवासी शाळेत स्थापित करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय बहुभाषिक नागरिकांचा दररोज गप्पांचा फड रंगत असून, त्यांच्या जेवणाची व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची पुरेपूर काळजी प्रशासनाकडून घेतली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ एका समस्येमुळे एकत्रित आलेल्या ९० नागरिकांमध्ये घराकडे जाण्याची ओढ मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे़
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाºया पर जिल्ह्यातील नागरिकांना जिंतूर तालुक्यातील अकोली येथील शासकीय निवासी शाळेत तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात ९० जणांना ठेवण्यात आले आहे़ या केंद्राची गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास पाहणी केली असता, वेगळेच चित्र पहावयास मिळाले़ या केंद्रात असलेल्या नागरिकांना मशिदीच्या पुढाकारातून दररोज चहा, बिस्कीट, केळी, खिचडी, पोहे आदींची सोय करून देण्यात आली आहे़ या साठी शेख अखिल, नवाज कुरेशी, शेख इलियास शेख बारी, रियाज खान, साजिद झकीया, अलीम शेख हे काळी मशिद कमिटीचे सदस्य या नागरिकांसाठी परिश्रम घेताना दिसून येत आहेत़ या विलगीकरण केंद्रात कोणाचं तान्हुलं आवारात धावताना दिसतं तर काही माता-भगिनी सामाजिक अंतर राखून घरी जाण्याच्या चिंतेत बोलत असल्याचे दिसून आले़ इथे जेवण्याची सोय भरपूर आहे़ आतापर्यंत उघड्यावर अथवा झोपडीत आयुष्य काढले़ इथे गाद्या आणि पंख्याखाली आराम करतोय, तरीही घराकडे जाण्याची ओढ कायम आहे, असे या निवारा केंद्रातील उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय नागरिक सांगत होते़
उत्तर प्रदेशातील एक मजूर यावेळी म्हणाला, ‘घर की याद आती है़़़ हमे घर छोड दो़़ आप कुछ किजीए, नाश्ता, खाना समय पे मिलता है, कोई शिकायत नही, फिर भी घर में माताजी, पिताजी, बच्चे है, उनकी बहुत याद आती है, हमे घर जाने दो’ असे म्हणत त्यांनी आपल्या भावना मोकळी वाट करून दिली़ यावेळी नागपूर येथून ऊसतोड करून जाणारे २७ जणही १४ दिवसांसाठी येथे क्वारंटाईन करण्यात आले आहेत़ त्यांनीही घराची ओढ लागल्याचे सांगितले़ सासऱ्याच्या अंत्यविधीसाठी नांदेडकडे आम्ही जात होतो; परंतु, पोलिसांची परवानगी घेतली नसल्याने ताब्यात घेवून येथे क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे एका व्यक्तीने सांगितले़ यावेळी काही जण सावलीचा आधार घेवून मोबाईलवर नातेवाईकांशी बोलत असल्याचे दिसून आले़ तर काही जण मोबाईलवर गेम खेळत वेळ घालवत असल्याचे पहावयास मिळाले़ एकमेकांशी अनोळखी असलेले हे नागरिक आपापल्या भाषेतून आधूनमधून एक-दुसºयांशी संवाद साधतानाही दिसून आले़
केंद्रातील व्यक्तींची नियमित आरोग्य तपासणीयेथील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलेल्या व्यक्तींची आरोग्य विभागाच्या वतीने नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते़ कोणाला सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे तरी नाहीत ना, याची पडताळणी केली जाते़ तसेच त्यांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी तहसीलदार सुरेश शेजूळ स्वत: लक्ष ठेवून आहेत़ या ठिकाणी दोन आरोग्य सेवकांची पूर्णवेळ आरोग्य विभागाने नियुक्ती केली आहे़ जिंतूर शहरात दोन ठिकाणी विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ या ठिकाणी महसूल व नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी या विलगीकरण कक्षातील नागरिकांची काळजी घेत असल्याचे दिसून आले़