गंगाखेड: मुंबई येथून खाजगी रुग्णवाहिकेतून दि. १४ एप्रिल रोजी आलेल्या पाच जणांच्या स्वॅबचे अहवाल गुरुवार रोजी निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. या पाच ही जणांना अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहातील संस्थात्मक क्वारंटाईन कक्षात हलविताच पुण्यावरून परतलेले अन्य पाच नवीन संशयित उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. यात एका आठ महिन्याच्या गरोदर महिलेचा समावेश असल्याने तालुका वासीयांची धाकधूक वाढली आहे.
सध्या निर्माण झालेल्या कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात लॉकडाऊन घोषित करून जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आलेल्या असतांना कामाच्या शोधार्थ मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरासह परराज्यात व विदेशात गेलेले असंख्य नागरिक मिळेल त्या वाहनाने दुचाकीवर किंवा पायी चालत चोरट्या मार्गाने आपआपल्या गावी परतत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पहावयास मिळत आहे. दि. २९ फेब्रुवारी रोजी मुंबईतील खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी गेल्यानंतर दिड महिना तेथे थांबून ही शस्त्रक्रिया न झाल्याने दि. १४ एप्रिल रोजी मुंबई येथून खाजगी रुग्णवाहिकेतुन शहरात आलेल्या तालुक्यातील चार जणांना व रुग्णवाहिका चालकास उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. दि. १६ एप्रिल गुरुवार रोजी या सर्वांच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याने या सर्वांना अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहात असलेल्या संस्थात्मक क्वारंटाईन कक्षात हलविण्यात आले. या पाच जणांचा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य प्रशासन सुटकेचा श्वास सोडत नाही तोपर्यंत दि. १६ एप्रिल रोजीच्या पहाटे पुणे येथून गावाकडे जाण्यासाठी गंगाखेड शहरात आलेल्या सेलू तालुक्यातील २५ वर्षीय युवकास पोलीस निरीक्षक वाय. एन. शेख यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सकाळी आठ वाजेच्या सुमारास पुणे येथून परतलेल्या शहरातील एका २० वर्षीय युवकास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर सकाळी दहा वाजेच्या सुमारास पुण्यावरून आलेले तरुण दांम्पत्य व अन्य एकजण तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आले. सेलू तालुक्यातील एका युवकासह पुणे येथून आलेल्या तालुक्यातील चार अशा एकूण पाच जणांच्या स्वॅबचे नमुने डॉ. केशव मुंडे, परिचारिका श्रीमती के. यु. चौधरी, श्रीमती एस.बी. लाड, श्रीमती ए.बी. वाघमारे, प्रयोग शाळेचे प्रविण जायभाये, आरोग्य कर्मचारी शेख शफी, नागेश चव्हाण, शेख खाजा यांनी गुरुवार रोजी तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडे पाठविले आहे. मुंबई येथून आलेल्या पाच जणांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर गुरुवार रोजी पुण्यावरून आलेले पाच संशयित उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याने व यातील विवाहिता ही आठ महिन्याची गरोदर असल्याने तालुका वासियांची धाकधूक वाढली आहे.