परभणी: कोरोना संसर्गजन्य रुग्णांची राज्यातील आकडेवारी वाढत असल्याने परभणीतील नागरिकांनी आता स्व:ताहूनच आपल्या कॉलन्या बरिकेटस् लावून बंद करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांबरोबरच आता कॉलन्यांमधील अंतर्गत रस्तेही बंद दिसून येत आहेत.
कोरोना संसर्गजन्य आजाराचा राज्यात फैलाव वाढत आहे. शिवाय परभणी जिल्ह्याशेजारील हिंगोली जिल्ह्यातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने परभणी शहरातील अनेक नागरिकांनी आता ही बाब गांभिर्याने घेण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यांवर अनावश्यक फिरणा-यांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी बाजारपेठेमधील मुख्य रस्ते बॅरिकेट्सने बंद केले आहेत. असे असताना शहरातील विविध कॉलन्यांमधील नागरिकांनी आता स्वत:हूनच त्यांचा परिसर बॅरिकेट्स लावून बंद करण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील गंगाखेड रोड वरील कृष्णाई पार्क भागातील नागरिकांनी गुरुवारी रात्री या परिसरात येणारे सर्व मुख्य रस्ते बांबूच्या काठ्या लावून बंद केले. तसेच बाहेरील कोणत्याही व्यक्तीला कॉलनी मध्ये प्रवेश बंद केला आहे. तसे फलक या रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. याशिवाय शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील देशमुख हॉटेल, उघडा महादेव, एमआयडीसी, गजानन नगर, आर्यनंदी चौक, खानापूर फाटा, कृषीसारथी कॉलनी आदी भागांकडे जाणारे रस्ते शुक्रवारी सकाळी नागरिकांनी बंद केले केले. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब देशमुख, विश्वजीत बुधवंत, अक्षय देशमुख, विशाल बुधवंत आदींची उपस्थिती होती.