परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून बुधवारी दुपारी प्रशासनाला मिळालेल्या अहवालांमध्ये ६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ३०३ वर पोहोचली आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. दररोज जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. १५ जुलै रोजी दुपारी जिल्हा प्रशासनाला २१ संशयित रुग्णांचे नमुने प्राप्त झाले. त्यामध्ये १५ अहवाल निगेटिव्ह असून ६ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात परभणी शहरातील आझम चौक आणि जिल्हा सरकारी रुग्णालयातील एका कर्मचार्याचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला.
त्याचप्रमाणे सेलू तालुक्यातील ३ आणि मानवत तालुक्यात १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. या सहा रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ३०३ वर पोहोचली आहे. तत्पूर्वी मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील ७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते. आतापर्यंत जिल्ह्यात १३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात १५९ रुग्ण उपचार घेत आहेत.