परभणी: गंगाखेड येथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरलेल्या नियमबाह्य स्वागत समारंभाची चौकशी करण्यासाठी ३ उपजिल्हाधिकाऱ्यांची चौकशी समिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नियुक्त केली आहे. ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर सोमवारी तातडीने याबाबत आदेश काढण्यात आले.
गंगाखेड येथील व्यापारी राधेश्याम भंडारी यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम २८ जून रोजी गंगाखेड येथे आयोजित केला होता. हा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या अनुषंगाने लागू केलेल्या सर्व नियमांची पायमल्ली करणारा होता. ५० पेक्षा अधिक व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार, खासदार, महसूल, पोलीस विभागातील अधिकारी, व्यापारी, प्रतिष्ठीत व्यक्ती आदींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
या कार्यक्रमानंतर ५ जुलै रोजी भंडारी कुटुंबातील एका महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १९ जुलैपर्यंत या कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या ११० पेक्षा अधिक व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे गंगाखेड हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. या सर्व बाबीला कार्यक्रमाचे आयोजक राधेश्याम भंडारी यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांना ५ लाख रुपयांचा दंड ठोठावून ७ दिवसात सदरील रक्कम भरण्याचे आदेशित केले होते. असे असले तरी ही नोटीसच संबंधिताला तामील झाली नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने रविवारी ‘बडेजावपणाचा थाट, अनेकांची लावून गेला वाट’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यामध्ये या प्रकरणात प्रशासनाकडून कसा निष्काळजीपणा केला गेला, याचे वाभाडे काढण्यात आले होते.
या वृत्ताची दखल घेऊन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी भंडारी कुटुंबियांकडून आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभाची चौकशी करण्यासाठी तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर आणि जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा यांचा समावेश आहे. हे अधिकारी सदरील स्वागत समारंभासाठी रितसर परवानगी घेतली होती काय? नेमके किती लोक या कार्यक्रमास उपस्थित होते? इत्यादी बाबींची चौकशी करणार आहेत. यासंदर्भातील अहवाल तात्काळ सादर करावा, असे आदेश सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.