परभणी : संचारबंदी काळात विनाकारण रस्त्यांवरून फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी मंगळवारी रस्त्यावर उतरून स्वतः तपासणी केली.
जिल्ह्यात संचारबंदी लागू असतानाही नागरिक बिनधास्तपणे रस्त्याने फिरत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर १४ जुलै रोजी परभणी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शहरातील आपना कॉर्नर, नानलपेठ कॉर्नर, शिवाजी चौक या भागात पोलिसांनी घराबाहेर पडलेल्या प्रत्येक नागरिकाची कसून तपासणी केली. यादरम्यान मंगळवारी दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय हे अपना कॉर्नर भागात पोहोचले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आर. रागसुधा आणि सहाय्यक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांचीही उपस्थिती होती.
या पोलिस अधिकाऱ्यांनी काही वाहनधारकांची तपासणीही केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पोलिस अधीक्षकांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी रस्त्यावर उतरून तपासणी केल्याने शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे दिसून आले.