परभणी : जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्ण वाढले असून, त्यातील सेलू येथील एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली.
जिल्ह्यात मागील दोन आठवड्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र मंगळवारी सकाळी सेलू येथील एक ४५ वर्षीय महिला आणि मानवत शहरातील ४४ वर्षीय रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही वेळातच सेलू येथील बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेला सारी सदृश्य आजाराची लक्षणे होती. तसेच मधुमेह आणि हायपरटेन्शनचा त्रास होता, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९१ झाली असून, त्यापैकी ६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आता २५ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने जिल्हावासियांच्या चिंता वाढल्या आहेत.