परभणी : जिल्ह्यात शुक्रवारी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून, एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या चिंता वाढल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी दुपारी २१ संशयित नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात सात जणांचे पॉझिटिव्ह आणि १४ जणांचे निगेटिव्ह अहवाल आहेत. पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या रुग्णांमध्ये जिंतूर शहरातील अर्बन कॉलनी, मानवत शहरातील कोक्कर कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुष, गोदु गल्लीतील १४ वर्षीय मुलगी, गंगाखेड शहरातील आंबेडकरनगर येथील ७४ वर्षीय वृद्ध, ओमनगरातील ५१ वषीर्य पुरुष, पालम शहरातील फळा रोडवरील ५४ वर्षीय पुरुष आणि तालुक्यातील ढवळकेवाडी येथील १४ वर्षीय मुलगा अशा सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
त्याचप्रमाणे दर्गारोड भागातील रहिवासी असलेल्या कोरोनाबाधित वृद्ध नागरिकाचा ३१ जुलै रोजी सकाळी ९.२५ च्या सुमारास मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयातील हा सेवानिवृत्त कर्मचारी होता. त्यास त्रास होत असल्याने १९ जुलै रोजी तो उपचारासाठी दाखल झाला होता. ३१ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या आता ३० झाली आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६३० झाली आहे.