परभणी: शहरातील एमआयडीसी भागातील कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या तरुणाच्या १० नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेला तरुण परभणी शहरातील एमआयडीसी भागात 13 एप्रिल रोजी नातेवाईकांकडे पुण्याहून दुचाकीने आला होता. त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्याची आरोग्य तपासणी करून त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यात या तरुणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या तरुणाच्या कुटुंबातील १० जणांचे स्वॅब ही घेण्यात आले होते.
याबाबतचा अहवाल शुक्रवारी रात्री आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यामध्ये या तरुणाच्या संपर्कात आलेल्या दहाही नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. दरम्यान, या रुणाच्या नातेवाईकांसह जिल्ह्यातील अन्य 33 नागरिकांच्या स्वॅबचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.