जिंतूर: तालुक्यातील शेवडी येथे मुंबईहून आलेल्या एका कुटुंबातील तिघे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास विशेष आदेश काढून शेवडी गाव सील केले आहे. तर जिंतूर शहरासह ३ कि.मी.च्या परिसरात १६ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मुंबई येथील एक पोलीस कर्मचारी कुटुंबियांसह जिंतूर तालुक्यातील शेवडी या गावी आला होता. या कर्मचाऱ्याने कुटुंबियांसह स्वत:ची येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन घेतली. त्यानंतर या कुटुंबियास जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. येथे त्यांचे स्वॅब नमुने घेऊन ते नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. याबाबतचा अहवाल गुरुवारी रात्री आला. त्यामध्ये संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी या कर्मचाऱ्याची पत्नी व दोन मुलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर रात्री १२.३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी विशेष आदेश काढून शेवडी हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तसेच जिंतूर नगरपरिषद हद्द आणि ३ कि.मी.च्या परिसरात १६ मेच्या रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. संचारबंदी काळात इतर कोणताही व्यक्ती रस्त्यावर फिरताना आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध कारवाई केली जाणार आहे, असेही या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.