परभणी: जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नागरी भागात संचारबंदीचे आदेश काढले आहेत. गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेपासून ते रविवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परभणीकरांना लॉकडाऊनला सामोरे जावे लागणार आहे.
जिल्ह्यामध्ये दोन आठवड्यांपासून परिस्थितीत बदल झाला आहे. दररोज कोरोनाग्रस्त रुग्ण समोर येत असल्याने नागरिकांची धडधड वाढली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणे, कार्यक्रमांचे आयोजन करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून सूट दिलेल्या कालावधीत नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केवळ नागरी भागासाठी संचारबंदी लागू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार परभणी महानगरपालिकेच्या हद्दीत ५ कि.मी. परिसरापर्यंत आणि सर्व नगरपालिका, नगरपंचायतीच्या हद्दीत ३ कि.मी.पर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.
ग्रामीण भाग वगळलाजिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश काढताना केवळ नागरी भागापुरतीच ही संचारबंदी लागू केली आहे. त्यातून सर्व ग्रामपंचायती वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे परभणी शहरासह आठही तालुक्यांच्या ठिकाणी संचारबंदी लागू राहणार आहे.