परभणी : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. मंगळवारी मध्यरात्री प्राप्त झालेल्या अहवालात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ११८ वर पोहोचली आहे.
मागील एक आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे वातावरण चिंताजनक झाले आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत असून, बुधवारी जिल्ह्यात आणखी तीन रुग्णांची भर पडली आहे. परभणी शहरात रामकृष्णनगर आणि ममता कॉलनी येथे प्रत्येकी एक असे दोन रुग्ण आढळले आहेत. रामकृष्णनगर कोरोनाबाधीत रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कात असलेल्या २० वर्षीय युवतीचा अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच ममता कॉलनी येथील एका ४४ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्याचप्रमाणे पाथरी शहरातील आनंदनगर येथील एका १९ वर्षीय युवकाचा अहवालही पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११८ वर पोहोचली आहे. त्यापैकी ९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, २३ रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.