परभणी: शहरातील नाक्यांवर थांबलेल्या पोलिसांना चकमा देऊन सुसाट वेगाने नांदेडकडे निघालेल्या एका चारचाकी वाहनाला वसमतरोडवरील विद्यापीठ गेट परिसरात फिल्मी स्टाईल थांबवून या वाहनातील ७ ते ८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास हा थरार घडला.
नांदेड जिल्ह्यातील एक कुटुंबिय परभणी येथे वास्तव्याला आहे. त्यामुळे गुरुवारी पहाटे क्रुझर गाडी घेऊन या कुटुंबातील व्यक्ती सकाळी परभणी शहरात दाखल झाला. जिंतूररोड परिसरात राहणाऱ्या कुटुंबियांना नांदेड येथे नेण्याचा बेत या व्यक्तीने आखला. त्यानुसार गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ही क्रुझर गाडी जिंतूररोडवरुन निघाली. ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या परिसरात कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी या वाहनास अडविले. मात्र वाहनचालकाने न थांबता गाडीचा वेग वाढवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाटील यांनी कंट्रोल रुमला ही माहिती दिली. उड्डाणपूलावरुन ही चारचाकी गाडी गंगाखेडरोड किंवा वसमतरोड भागात जावू शकते, हे लक्षात घेऊन दोन्ही रस्त्यांवर पोलीस कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यात आले. मात्र ही गाडी उड्डाणपुलावरुन बसस्थानकाच्या समोररुन वसमतरोडकडे येत असल्याची माहिती समजताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात तीन पोलीस कर्मचा-यांनी गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहनाचा वेग वाढवत नांदेडच्या दिशेने प्रयाण केले. त्यामुळे ही माहिती वसमत रोड परिसरातील पोलीस कर्मचा-यांना देण्यात आली.
याचवेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी कंट्रोलरुमवरील माहितीच्या आधारे वसमतरोडवरील विद्यापीठ गेट परिसरात नाका बंदी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी विद्यापीठ गेटसमोरील रस्त्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांच्या दोन चारचाकी गाड्या आडव्या लावून नांदेडकडे जाणारी ही क्रुझर गाडी थांबविण्यात आली. या वाहनातील चार ते पाच महिला आणि पुरुष अशा सात ते आठ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करुन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये वाहनचालकाविरुद्ध भरधाव वेगाने वाहन चालविणे, संचारबंदीचे उल्लंघन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वेळीच रस्ता अडवल्याने गाडी थांबलीसकाळी ८.३० वाजेच्या सुमारास वॉकीटॉकीवरुन पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी दिलेला संदेश ऐकला. त्यावेळी वसमतरोड भागातच असल्याने नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांच्या सहाय्याने आमच्या दोन्ही गाड्या रस्त्यावर आडव्या लावल्या. त्यामुळेच भरधाव वेगाने जाणारी ही गाडी थांबवू शकलो. या ठिकाणी बॅरिकेटस् असते तर ते तोडून वाहनचालक पुढे गेला असता. हा प्रकार थरार निर्माण करणाराच होता. अखेर या वाहनास थांबविण्यास आम्हाला यश आले.-नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस अधीक्षक