परभणी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील संचारबंदीत आणखी दोन दिवसांची वाढ केली असून, आता १७ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील व्यवहार बंद राहणार आहेत़
जिल्ह्यात मागील दोन-तीन आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे़ त्यामुळे जिल्ह्यात चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संचारबंदीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे़ यापूर्वी १२ जुलैपासून ते १५ जुलैपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती़ बुधवारी रात्री १२ वाजता हे आदेश शिथिल होणार होते़ त्यापूर्वीच सायंकाळी ५़३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश काढले आहेत़ त्यामध्ये बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात बाधित व्यक्ती आढळून येत आहेत़ तसेच त्यांच्या जवळून संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही कोरोनाची बाधा होत आहे़ परिणामी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे़ बाधित व्यक्ती किंवा त्यांच्या संपर्कातील व्यक्तींकडून कोरोना संसर्ग फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही़ ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे़ त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्ह्यात १५ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपासून ते १७ जुलैचे मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़