परभणी : उन्हाळी सुट्या आणि लॉकडाऊनमुळे दोन महिन्यापासून बंद असलेल्या शाळा सोमवारी विद्यार्थ्यांविनाच भरल्या. जिल्ह्यात प्रवेश पंधरवाड्याला सुरुवात झाली असून, जि.प. शाळांमधून प्रवेशाचे नियोजन करण्यात आले.
जिल्ह्यातील शाळा कधी सुरू होणार? कशा सुरू होणार? याबाबत अद्याप स्पष्ट नियोजन नसले तरी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या निमित्ताने सोमवारपासून शिक्षकांच्या उपस्थितीने शाळा पुन्हा एकदा गजबजल्या आहेत. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ठिकठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक उपस्थित झाले. मुख्याध्यापकांनी शिक्षकांची बैठक घेऊन गावातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे नियोजन केले. गावात फिरून विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेण्याचे आवाहनही शिक्षकांना करण्यात आले.
त्याचप्रमाणे पुणे, मुंबई या भागात कामानिमित्त स्थलांतरित झालेले कामगार आता जिल्ह्यात परतले आहेत. या कामगारांच्या पाल्यांचे प्रवेशही जिल्हा परिषद शाळांमध्ये करून घेतले जाणार असल्याची माहिती मिळाली. एकंदर शैक्षणिक सत्र सुरू झाले असून, प्रवेश पंधरवड्याच्या निमित्ताने शाळेत उपस्थित झालेल्या शिक्षकांमुळे बिनविद्यार्थ्यांची शाळा भरल्याचा अनुभव अनेकांना आला.