गंगाखेड (जि. परभणी) : येथील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या घरातील लातूर येथे पार पडलेला विवाह सोहळा गंगाखेडकरांना चांगलाच महागात पडला आहे. सोहळ्याच्या माध्यमातून गंगाखेड शहरात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असून, व्यापाऱ्याच्या घरातील ७ जणांसह इतर ४ असे ११ जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे गंगाखेडकरांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.
गंगाखेड येथील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या मुलाचा विवाह सोहळा २५ जून रोजी लातूर येथे पार पडला. या सोहळ्यावरुन परत आल्यानंतर ३ जुलै रोजी या व्यापाऱ्याच्या कुटुंबातील एका ६० वर्षीय महिलेला उलटी- जुलाबचा त्रास सुरू झाला. ६ जुलै रोजी या ६० वर्षीय महिलेसह सेलमोहा येथील एका ५५ वर्षीय महिलेचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर व्यापाऱ्याच्या कुटुंबातील २६ जणांसह इतर १७ असे ४३ जणांचे स्वॅब घेण्यात आले. तसेच सेलमोहा येथील महिलेच्या संपर्कातील २० जणांचे स्वॅब घेतले होते. ८ जुलै रोजी व्यापाऱ्याच्या कुटुंबातील एका महिलेसह दोन पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यापाठोपाठ याच दिवशी रात्री उशिरा मिळालेल्या यादीत याच कुटुंबातील पाच जण कोरोनाबाधित झाले आहेत.