परभणी : कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा उपाययोजना सुरू केल्या असून, या अंतर्गत शहरात आठ ठिकाणी स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग घटला आहे. रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली असून, सर्व व्यवहार खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारपेठ, बसस्थानक, रेल्वेस्थानक यासह शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत आहे.
संसर्ग कमी झाला असला तरी अजूनही कोरोनाचे नियम पाळण्याचे निर्बंध कायम आहेत. त्यामुळे शारीरिक अंतर राखणे, मास्कचा वापर करणे या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
मात्र, नागरिकांमधील कोरोनाची भीती कमी झाली असून, त्यातूनच या नियमांचे पालन होत नसल्याची बाबत निदर्शनास आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी महापालिकेने आता उपाययोजना सुरू केल्या आहेत. या अंतर्गत मनपा आयुक्त देविदास पवार यांनी शहरातील विविध भागांत स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती केली असून, हे स्वच्छता निरीक्षक विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करणार आहेत.
या निर्णयानुसार आपना कॉर्नर भागात मेहराज अहमद, विसावा कॉर्नर विकास रत्नपारखे, जाम नाका राजू झोडपे, गंगाखेड नाका करण गायकवाड, शिवाजी चौक श्रीकांत कुऱ्हा, वसंतराव नाईक यांचा पुतळा परिसर अब्दुल शादाब, गुलशना बाग न्यायरत्न घुगे आणि काळी कमान परिसरात लक्ष्मण जोगदंड या स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलिसांकडे मागितले मनुष्यबळ
शहरात आठ ठिकाणी स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती केली असली तरी प्रत्यक्षात नागरिकांकडून दंड वसूल करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
त्यामुळे स्वच्छता निरीक्षकांच्या मदतीला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती असणे गरजेचे असून, या स्वच्छता निरीक्षकांसाठी पुरेसे पोलीस कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आयुक्त देविदास पवार यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर ही पथके कारवाई सुरू करणार आहेत.