जिंतूर (परभणी ) : पालिकेचा नामांतर विभाग सतत तीन महिन्यापासून बंद असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. हा विभाग तातडीने सुरू करावा या मागणीसाठी नगरसेवकांनी पालिका कार्यालयाला आज दुपारी कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्याधिकार्यांनी विभाग तातडीने सुरु होईल असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
पालिकेच्या नामांतर विभागाचे प्रमुख लक्ष्मण तळेकर मागील दोन महिन्यापासून गैरहजर आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी हा विभाग तातडीने सुरु करण्याची मागणी केली. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांना बाहेर काढत पालिका कार्यालयाला कुलूप ठोकण्याच्या प्रयत्न केला.
आंदोलनाची दखल घेत मुख्याधिकारी जयंत सोनवणे यांनी हा विभाग तात्काळ सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात नगरसेवक दलमीर पठाण, अहेमद बागवान, शोएब जनिमिया, प्रदीप चोधरी, शेख इस्माईल फेरोज कुरेशी, शेख सलीम, शोएब मिर्झा, चंद्रकांत बहिरट, अब्दुल रहमान, अ. सोहेल कपिल फारुकी आदी नगरसेवकांचा सहभाग होता.