परभणी : गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये कापसावर बोंडअळीने हल्ला चढविला. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादनात मोठी घट झाली होती. यावर्षी कृषी विभागाने दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचे नियोजन केले आहे. बोंडअळीच्या भितीने कापूस लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये ५ लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. त्यापैकी २ लाख हेक्टर क्षेत्र हे सोयाबीनसाठी तर १ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीसाठी प्रस्तावित केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील कापूस उत्पादकांनी लागवडही केली. कमी- अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर जिल्ह्यातील कापूस पीक चांगले बहरले. कापूस पिकाची परिस्थिती चांगली असल्याने शेतकऱ्यांनी फवारणी व इतर कामांसाठी पिकावर खर्च केला. परंतु, पहिल्याच वेचणीनंतर गुलाबी बोंडअळीने जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकावर हल्ला चढविला. त्यामुळे कापूस पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली. शेतकऱ्यांनी कापूस पिकावर केलेला खर्चही उत्पादनातून निघाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक आर्थिक कोंडीत सापडला.
जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने यावर्षीच्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. त्यामध्ये कापसासाठी दीड लाख तर सोयाबीन पिकासाठी २ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. परंतु, कापूस उत्पादकांना मागील वर्षीच्या खरीप हंगामात आलेला अनुभव हा कटु होता. त्यामुळे कृषी विभागाने कापसासाठी प्रस्तावित केलेल्या हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होणे कठीण आहे. त्यामुळे सहाजीकच यावर्षीच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र घटणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उत्पादन घटल्यानंतरही मिळाला नाही भावही गतवर्षी जिल्ह्यातील बाजारपेठेत कापसाला प्रति क्विंटल ६ हजार रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे गेल्या खरीप हंगामात कापसाच्या लागवडीत मोठी वाढ झाली. मात्र कापसाचे उत्पादन होऊनही यावर्षी कापूस उत्पादकांना प्रति क्विंटल ५ हजार २०० रुपयांच्या वर भाव मिळाला नाही. त्यामुळे उत्पादनात घट होऊनही कापसाला भाव मिळाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
बोंडअळीच्या जनजागृतीची गरजयावर्षीचा खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्यास महिनाभरात खरीप हंगामाच्या पेरणीस सुरुवात होणार आहे. त्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ग्रामीण भागात बोंडअळीच्या प्रादूर्भावाबाबत जनजागृती करणे अपेक्षित होते. परंतु, कृषी कार्यालयाच्या वतीने ग्रामीण भागात केवळ पोस्टर्स चिटकवून जनजागृती करण्याचा सोपास्कार पार पाडला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्रभावीपणे बोंडअळीच्या जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.