परभणी : चलनातील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. शहरातील विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये या नोटा बदलण्यासाठी विविध बँकेच्या शाखेमध्ये ग्राहकांची धांदल उडू नये, गैरसोय होऊ नये, यासाठी काउंटर सज्ज ठेवल्याचे दिसून आले. परंतू, पहिल्याच दिवशी अगदी बोटावर मोजण्या इतक्या तुरळक ग्राहकांनी बँकेत हजेरी लावून नोटा बदलल्याचे बँक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
परभणी शहरात राष्ट्रीयकृत बँकांमध्ये महत्त्वाच्या आणि सर्वाधिक शाखा, खाते असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियात आरबीआयच्या नियमाप्रमाणे सदरील प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली. शहरात जवळपास दहा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा आहेत. या सर्व ठिकाणी रोख रक्कम काढणे तसेच पैसे जमा करणे यासाठी असलेल्या कॅश काऊंटरवर दोन हजारांची नोट बदलण्यासाठीची प्रक्रिया ठेवण्यात आली होती. त्यानुसार संबंधित काउंटरवर ग्राहकांनी तसेच नागरिकांनी स्वतःच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले आहे. याशिवाय अन्य राष्ट्रीयकृत तसेच खासगी आणि सहकारी बँका, पतसंस्था येथेही यंत्रणा सुरु करण्यात आली आहे.
घाई न करण्याचे आवाहनअजून तरी वेगळे असे कोणतेही कॅश काऊंटर सुरू करण्यात आलेले नाही, असे दिसून आले. एकंदरीत कोणत्याही बँकेमध्ये नोटा बदलण्यासाठी गर्दी दिसून आली नाही. त्यामुळे सर्व ठिकाणी प्रक्रिया सुरळीतपणे, शांततेने सुरू होती. बँकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती देणे, संबंधितांना जनजागृती करून नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा अवधी असल्याने नागरिकांनी ग्राहकांनी घाई करू नये, असे आवाहन बँकेत आल्यानंतर केले जात होते.