परभणी : सोशल मीडियाचा गैरवापर करून आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांवर परभणी पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये २८ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करीत १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सामाजिक शांतता व जातीय सलोखा टिकून राहावा, यासाठी पोलिस दलातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यात काही जण सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून सामाजिक शांततेला बाधा आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अशा व्यक्तींवर परभणी पोलिसांनी कारवाई केली. यात २८ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली, तर १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. समाजात सोशल मीडियाचा प्रभाव लक्षणीय वाढला आहे. त्यामुळे कोणतीही पोस्ट करण्यापूर्वी, तसेच माहिती शेअर करण्यापूर्वी या पोस्टबाबत सत्यतेबाबत खात्री करणे ही नागरिकांची नैतिक जबाबदारी असल्याचे पोलिस दलाने आवाहन केले.
शेअर करताना काळजी घ्यानागरिकांनी सोशल मीडियावर काही विवादास्पद मचकूर अगर फोटो, व्हिडीओ पोस्ट करू नयेत, अथवा शेअर करू नयेत; तसेच अफवा पसरविणारे संदेश देखील शेअर करू नयेत.- रागसुधा आर., पोलिस अधीक्षक.