परभणी : येथील वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी भवन कार्यालयावर दगडफेक करून काचांची तोडफोड केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या कार्यालयासमोर सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे.
परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करून शिवसेनेचे खा. बंडू जाधव यांनी २६ आॅगस्ट रोजी खासदार पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्पष्टीकरण देत खा.बंडू जाधव जिल्ह्यात भाजपाला पोषक वातावरण निर्माण करीत आहेत. काही अडचणी असतील तर त्या चर्चेद्वारे आणि बसून सोडविल्या जाऊ शकतात; परंतु अशा पद्धतीने व्यक्त होणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीने दिली होती. दिवसभराच्या या घडामोडीनंतर २६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास चार युवकांनी वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी भवन कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी २७ ऑगस्ट रोजी सकाळी राष्ट्रवादी भवन कार्यालयास भेट दिली. त्यानंतर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २६ ऑगस्ट रोजी रात्री ९.५० च्या सुमारास मोटारसायकलवर आलेल्या चार जणांनी राष्ट्रवादी भवनसमोर मोटारसायकल उभ्या करुन कार्यालयाच्या दिशेने दगड फेकून मारले. त्यामुळे काचा फुटल्या. या युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजीही केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन नवा मोंढा पोलीस ठाण्यात चार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर तट या प्रकरणाचा तपास करीत आहेत.