जिंतूर : जिंतूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे चार्जशीट लवकर पाठविणे व हजेरी माफ करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या एका पोलिस कर्मचारी विरुद्ध जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार- जिंतूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक भानुदास उमाजी पवार हे याच पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचे चार्जशीट लवकर पाठविण्यासाठी आणि हजेरी माफ करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार १३ डिसेंबर रोजी एका तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष कारवाई केली.
१४ डिसेंबर रोजी तक्रारदारास लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले, मात्र पोलीस कर्मचारी भानुदास पवार यास एसीबीकडे तक्रार केल्याचा संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. ते आता ही रक्कम स्वीकारणार नसल्याचे तक्रारदाराने सांगितले. त्यावरून जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस नाईक भानुदास पवार याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.