पूर्णा (परभणी ) : जिल्हाधिकारी पी. शिवशकर यांच्याशी उद्धट वागणूक करुन वाद घालत शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात २७ मे रोजी पहाटे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्राथमिक तपासात वाद घालणारा व्यक्ती वसमत तालुक्यातील तलाठी असल्याची माहिती पुढे आली आहे.
पूर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, पूर्णा तहसीलचे कोतवाल मुरलीधर मोर हे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत रविवारी मध्यरात्री कानडखेड शिवारातील पूर्णा नदी पात्रात अवैध वाळू चोरी करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी आले होते. ही पाहणी करून कानडखेड गावातून जात असताना एम.एच. २२/ए.आर. २२०७ या दुचाकीने दोघे जण जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीच्या पाठीमागे येत होते. त्यामुळे जिहाधिकाऱ्यांनी गाडी थांबवली. जिल्हाधिकाऱ्यांसोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकीवरील व्यक्ती कोण आहेत, हे पाहण्यासाठी त्यांच्या तोंडावर बॅटरीचा प्रकाश टाकला असता खंडू बाबुराव पुजारी याने तुम्ही कोण आहात? अशी विचारणा केली. त्यामुळे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर हे गाडी खाली उतरले असता खंडू पुजारी हा त्यांच्या अंगावर जात असताना सुरक्षा रक्षकाने त्यास पकडले.
गाडीतील अधिकारी हे जिल्हाधिकारी असल्याचे स्पष्ट होताच दुसऱ्या आरोपीने तेथून पळ काढला. वाद घालणारा व्यक्ती हा दारू प्यालासारखा वाटत असल्याने त्यास ताब्यात घेऊन पूर्णा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणी नंदकिशोर शेलारे यांच्या फिर्यादीवरुन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थी फौजदार पी. एल. गंधकवाड हे तपास करीत आहेत.
वाद घालणारा व्यक्ती तलाठीजिल्हाधिकाऱ्यांशी वाद घालणारा कांनडखेड येथील खंडू पुजारी हा वसमत तालुक्यातील पळशी तलाठी सज्जाचा तलाठी असल्याची माहिती पुढे आली आहे.