पाथरी - तालुक्यातील मसाला खु. येथे १६ जानेवारी रोजी रात्री ७.३० ते ८ वाजण्याच्या सुमारास दोन गटात झालेल्या भांडणानंतर परस्परविरोधी फिर्यादीवरून एका गटाच्या ९ तर दुसऱ्या गटाच्या ७ अशा १६ जणांविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मसाला खु. येथील सदाशिव बुवाजी शिनगारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गावातून आईचा जेवणाचा डबा मोटरसायकलवरुन शेतात घेऊन जात असताना मसाला पाटीजवळ मोटारसायकल अडवून ‘तू पोलीस पाटील झालास म्हणून आमची वाळू रोखणारा कोण’, असे म्हणत लाथाबुक्क्याने, लोखंडी रॉडने आणि काथ्याने मारुन जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्यावरुन दिलीप धरपडे, तुळशीराम गायकवाड, महेश गायकवाड, ज्ञानोबा गायकवाड, राजेभाऊ गायकवाड, उत्तम माने (सर्व. रा. मसला), दत्तात्रय नेमाने, लाला नेमाने, पिनू नेमाने (रा. गुंज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरी फिर्याद दत्तात्रय धोंडिबा नेमाने यांनी दिली असून, १६ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता आपली बहीण नंदाबाई धरपडे यांना भेटण्यासाठी मसाला येथे आलो होतो. बहिणीला भेटून ७.३०च्या सुमारास गुंजकडे दुचाकीवरून परत जात असताना, मसाला पाटीजवळ काहीजण गाड्या उभ्या करुन थांबले होते. यावेळी ‘गुंजला जायचे आहे, गाड्या बाजूला घ्या’, असे म्हटल्यावर ‘कोठून जायचे ते जा’, असे म्हणत शिवीगाळ केली तसेच हातातील काठीने मारहाण करून मोटारसायकल ढकलून दिली. ‘पुन्हा मसाला गावाला आलास तर पाहून घेईन’, अशी धमकी देत काठी व लाथाबुक्क्याने मारहाण केली. या तक्रारीवरून सदाशिव बुवाजी शिनगारे, बालासाहेब यादव, महादू शेंडगे, भालचंद्र शिनगारे, बाबा माने, पाराजी माने, मुक्तीराम तांदळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.