पाथरी : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान यंत्र सील करणे चालू असताना तालुक्यातील विटा बु. येथे दोन गटांत वाद झाला. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात पन्नास जणांवर गुन्हे नोंद झाले आहेत.
तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडले. दरम्यान, तालुक्यातील विटा बु. येथे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर निवडणूक यंत्र सील करत असताना गावात मोटारसायकलचा धक्का लागल्यावरून दोन गटांत वाद झाला. या प्रकारानंतर घटनास्थळी मोठा पोलीस तैनात करण्यात आला होता.
याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी विटा बुद्रुक गावातील व्यक्तीकडून गोपनीय माहिती घेतली असता गावातील बंडू हिंगणे यांना गोपाळ आरबाड हे दुचाकीवरून घेऊन जात असताना या दुचाकीचा धक्का नारायण आरबाड यांना लागला. त्यामुळे त्यांच्यात वाद होत भांडण झाले. यावेळी गावातील दोन्ही गटांमधील लोकांचा शोध घेतला; परंतु ते मिळून आले नाहीत. त्यानंतर संबंधित गावातील शिवाजी हारकळ व आरबाड पॅनेलचे ज्येष्ठ नेते आरबाड यांनी सांगितले की, हा प्रकार किरकोळ वादाचा होता. त्यांची एकमेकांविषयी काही तक्रार नाही; परंतु, या प्रकाराने ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहिता लागू असताना व जिल्हाधिकारी परभणी यांचे जमावबंदी आदेश लागूृ आहेत. यासंबंधी गावातील लोकांना माहिती असताना गावातील बंडू हिंगणे, गोपाळ आरबाड़, नारायण आरबाड, शिवाजी हारकळ, बालासाहेब आरबाड व इतर ४५ जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आचारसंहिता व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोना अंबादास मुजमुले यांच्या फिर्यादीनुसार पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.