यावर्षीच्या खरीप हंगामात मृग नक्षत्रात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. मात्र १० जून नंतर पाऊस गायब झाला. पंधरा ते वीस दिवसांचा खंड पडूनही पाऊस होत नसल्याने पिके धोक्यात आली होती. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होते. त्यातच वाढत असलेल्या उन्हामुळे पिकांना धोका अधिकच वाढला होता.
बुधवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर भीज पाऊस झाला आहे. गुरुवारी देखील दिवसभर ढगाळ वातावरण असून पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे संकट दूर झाले आहे.
बुधवारी रात्री साधारणत बारा वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाला प्रारंभ झाला. पूर्णा तालुक्यात सर्वाधिक २१ मिमी पावसाची नोंद झाली. त्याचप्रमाणे परभणी तालुक्यात १६.१, पाथरी १२.५, जिंतूर १२.४, पालम १२.५ सेलू १२.७, सोनपेठ ७.७, मानवत १०.२ आणि गंगाखेड तालुक्यामध्ये ८.१ मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी १३.१ मिमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २०१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. त्या तुलनेत २७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत १३४ टक्के पाऊस अधिक झाला आहे.
परभणी ग्रामीण मंडळात सर्वाधिक पाऊस
जिल्ह्यात बुधवारी रात्री सरासरी १३.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. परभणी ग्रामीण मंडळांमध्ये सर्वाधिक ४७.५ मिमी पाऊस झाला. त्याचप्रमाणे पाथरी तालुक्यातील कासापुरी मंडळात २८ मिमी आणि पूर्णा तालुक्यातील कावलगाव मंडळात ३८ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच इतर मंडळातही पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले आहे.
या मंडळांकडे फिरवली पाठ
जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असले तरी काही मंडळांमध्ये मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी, जिंतूर तालुक्यातील बोरी आणि पाथरी तालुक्यातील हादगाव या मंडळात पाऊस झाला नसल्याने मंडळातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे.