वालूर : सेलू तालुक्यातील वालूर व परिसरात १८ व १९ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे जवळपास १०० एकरवरील रबी हंगामातील ज्वारी, हरभरा, भुईमूग, ऊस व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वालूर व परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी हजारो रुपयांचा खर्च करीत कापूस, सोयाबीन, तूर, मूग आदी पिके घेतली. मात्र ही पिके काढणीस आल्यानंतर सप्टेंबर २०२० या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यानंतर खरिपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला. या पाणीसाठ्याचा उपयोग घेत खरीप हंगाामातील पिकांचे झालेले नुकसान रबी हंगामातील पिकांमधून काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. पारंपरिक ज्वारी पिकाकडे पाठ फिरवून शेतकऱ्यांनी यावर्षी हरभरा. भुईमूग, ऊस, गहू व फळबाग मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यामुळे या हंगामातील पिकांमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र दि. १८ व १९ फेब्रुवारीच्या मध्यरात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, ऊस व फळबागांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे खरिपापाठोपाठ रबी हंगामातील पिकेही नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांच्या हातची नेली आहेत. त्यामुळे वालूर व परिसरातील शंभर एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
भाजप किसान मोर्चाचे साकडे
वालूर व परिसरातील पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी भाजप किसान मोर्चाच्या वतीने उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनावर तालुकाध्यक्ष दगडोबा जोगदंड, भागवत दळवे, महादेव गायके, जीवन ढवळे, शिवहरी शेवाळे, प्रदीप झिंबरे, बळीराम गटकळ, सखाराम दळवे, गोविंद गटकळ आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.