मानवत (परभणी ) : खोटी कागदपत्रे सादर करुन येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतून पीक कर्ज घेतल्या प्रकरणी एकाविरुद्ध २३ एप्रिल रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील मानोली येथील चंद्रकांत पंडितराव तळेकर यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये मानोली शिवारातील गट नं.३५३ मध्ये कोणतीही जमीन नावावर नसताना खोेटी कागदपत्रे सादर करुन ९८ हजार रुपयांचे पीक कर्ज उचलले. या प्रकरणी चंद्रकांत तळेकर यांनी बँकेची फसवणूक केली असल्याची तक्रार बँक व्यवस्थापक नितीन जगताप यांनी मानवत पोलीस ठाण्यात दिली. यावरुन चंद्रकांत तळेकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर मन्नाळे तपास करीत आहेत.
आरोपीचा आंदोलनात पुढाकार मानवत तालुक्यातील मानोली येथील ग्रामस्थांनी पाणीपुरवठा योजनेत भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप करीत १९ एप्रिल रोजी तहसीलदारांच्या कक्षात विष प्राशन करुन आंदोलन केले होते. या आंदोलनात चंद्रकांत तळेकर यांनी पुढाकार घेतला होता.