- विठ्ठल भिसेपाथरी : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून हादगाव येथील चारी क्रमांक 49 वर पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी जलसमाधी आंदोलन केले. मात्र प्रशासनाकडून पाणी सोडण्याचा निर्णय झालाच नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी स्वतःच कालव्यातून चारी क्रमांक 49 मध्ये पाणी सोडत करपून जाणाऱ्या पिकांना जीवनदान दिले. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील दुसरे पाणी आवर्तन 28 जानेवारीपासून सोडण्यात आले आहे. तर पाथरी तालुक्यात 11 फेब्रुवारी पासून पाणी सोडण्यात आले आहे. सध्या पैठण धरणातून डाव्या कालव्यात 800 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. मात्र, पाथरी तालुक्यातील हदगाव येथील चारी क्रमांक 49 मध्ये पाणी सोडण्यात आले नव्हते. पिके करपून जात असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी जायकवाडी विभागाकडे तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र, तांत्रिक अडचणी सांगत पाणी सोडण्यास दिरंगाई करण्यात आल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी गुरुवारी वरखेड हादगाव येथे कालव्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले. आंदोलन स्थळी जायकवाडीच्या उपविभागीय अभियंता भेट दिली घटनास्थळी पाथरीचे पोलीस निरीक्षक ही दाखल झाले पाणी सोडल्याशिवाय आंदोलन स्थगित केले जाणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.
अखेर शेतकऱ्यांनी स्वतःच सोडले पाणी दरम्यान, आज दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाचा कोणताही अधिकारी इकडे फिरकला नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास स्वतःच डाव्या कालव्यातून चारी क्रमांक 49 मध्ये पाणी सोडून घेतले आहे.
आठ दिवसांत पाणी सोडणार सध्या डाव्या कालव्यामध्ये पाणी पातळी कमी आहे. पातळी वाढल्यानंतर चारीत पाणी सोडले जाणार आहे. त्यासाठी किमान आठ दिवस लागतील. शेतकऱ्यांनी चारीतून पाणी सोडून घेतले असले तरी बंद करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे चे उपअभियंता पवार यांनी दिली.