लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या ६८ इच्छुकांनी गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंट्री बोर्डाच्या सदस्यांसमोर मुलाखती दिल्या.वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या शुक्रवारी परभणीत मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने सकाळीच पार्लमेंट्री बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील, अशोक सोनवणे, रेखाताई ठाकूर, प्रा.किशन चव्हाण हे परभणीत दाखल झाले. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाºया जिंतूर विधानसभा मतदारसंघातील १७, गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील १६, पाथरी विधानसभा मतदारसंघातील २० आणि परभणी विधानसभा मतदारसंघातील १५ अशा एकूण ६८ जणांनी मुलाखती दिल्या. त्यामध्ये जिंतूरचे माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, जि.प.सदस्य भगवान सानप, गंगाखेडचे काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गोविंद यादव, सुनिल बावळे, रिपब्लिकन सेनेचे उपाध्यक्ष विजय वाकोडे आदींचा समावेश होता. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दादाराव पंडित, वंदनाताई जोंधळे, दिलीप मोरे, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी डॉ.धर्मराज चव्हाण, प्रा.डॉ.सुरेश शेळके आदींची उपस्थिती होती.२८८ जागांची तयारी- अण्णाराव पाटील४या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंट्री बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीकडून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली जात आहे. एमआयएमला किती जागा सोडायच्या याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेतला जाणार आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आतापर्यंत विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील मुलाखती झाल्या आहेत. मुलाखतीची प्रक्रिया १५ दिवसांमध्ये पूर्ण केली जाणार असून त्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. निवडून येण्याची क्षमता व सामाजिक समिकरणे विचारात घेऊनच उमेदवाराची निवड करणार असल्याचे ते म्हणाले.काही दिग्गज इच्छुक पण ... आता नाही४यावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अण्णाराव पाटील म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील विविध पक्षातील काही दिग्गज नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे; परंतु, सद्यस्थितीत त्यांची नावे सांगता येणार नाहीत. ऐनवेळी ती जाहीर केली जातील, असे ते म्हणाले. मुलाखतीची प्रक्रिया गुरुवारी झाल्यानंतर पुन्हा या दिग्गजांसाठी मुलाखत प्रक्रिया राबविणार का? या प्रश्नावर त्यांनी तसे होऊ शकते, असे सांगितले.
परभणीत कार्यकर्त्यांची गर्दी;६८ इच्छुकांनी दिल्या वंचित बहुजन आघाडीच्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:31 AM