३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या असलेल्या गंगाखेड बसस्थानकाची इमारत जीर्ण झाली आहे. मागील पावसाळ्यात इमारतीला गळती लागली होती. हिवाळा व उन्हाळ्यात मात्र इमारतीच्या छताचा व भिंतीचा मलबा कोसळत आहे. छताचा मलबा प्रवाशांच्या अंगावर पडल्याने प्रवासी जखमी झाल्याच्या तीन घटना या पूर्वी घडल्या आहेत. असे असतानाही एसटी महामंडळाच्या वरिष्ठांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी या बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना असुविधांचा सामना करून प्रवास पूर्ण करावा लागत आहे. यातच बसस्थानक परिसरात प्रवाशांकरीता बांधलेल्या पिण्याच्या पाण्याची टाकी मागील अनेक वर्षापासून कोरडी आहे. तसेच नळाच्या सर्व तोट्या गायब आहेत. त्यामुळे प्रवाशांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. बसस्थानक परिसरात पक्के डांबरीकरण झाले नसल्याने खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्डयामध्ये पाणी साचून दुर्गंधी निर्माण होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासनाने याकड लक्ष देवून या इमारतीची डागडुजी करत बसस्थानक परिसरात प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
धोकादायक इमारतीत प्रवाशांची वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:16 AM