परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी १८ फेब्रुवारी रोजी आमदार सुरेश वरपूडकर, आ. मेघना बोर्डीकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी आमदार सुरेश देशमुख यांच्यासह एकूण ३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, एकूण अर्जांची संख्या ५३ झाली आहे.
परभणी आणि हिंगोली या दोन् जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा बँकेच्या शेतकरी भवन परिसरात नामनिर्देशन पत्रांची विक्री आणि स्वीकृती १५ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील महत्त्वपूर्ण सहकारी संस्था असलेल्या या बँकेच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. गुरुवारी या बँकेसाठी एकूण ३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात सुरेशराव पतंगे-वडगावकर, श्रीकांत उत्तमराव भोसले, आ. मेघना बोर्डीकर, यशश्री भगवान सानप, भगवान ज्ञानोबाराव सानप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, दत्तराव काळे, सविता सुनील नादरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश वरपूडकर, त्र्यंबकराव मुळे, गंगाधरराव कदम, रूपाली राजेश पाटील, भावना रामप्रसाद कदम, माजी आमदार सुरेश देशमुख, बालासाहेब हरिभाऊ निरस, सुशीलकुमार सुरेशराव देशमुख, विजय जामकर, महापालिकेचे उपमहापौर भगवानराव वाघमारे, विद्या कालीदास चौधरी, शिवाजी बाबूराव मव्हाळे, भगवान मारोतराव वटाणे, रेणुकाबाई पांडुरंग राठोड, पंकजकुमार पांडुरंग राठोड, सुमित स्वराजसिंह परिहार, स्वराजसिंह परिहार, सुरेश रामभाऊ गिरी या ३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
आतापर्यंत या बँकेसाठी १८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी ३५ जणांचे अर्ज प्राप्त झाले असून, एकूण ५३ उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल झाले आहेत. गुरुवारी दिवसभर बँकेच्या परिसरात राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे दिवसभरात अर्ज दाखल केलेल्यांमध्ये विद्यमान संचालकांचाही समावेश आहे.
केवळ दोन दिवस शिल्लक
या बँकेच्या निवडणुकीसाठी २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मात्र त्यात आज, शुक्रवारी शिवजयंती आणि २१ फेब्रुवारीला रविवार असे दोन दिवस सुटीचे आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडे केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे २० आणि २२ फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी वाढेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
२१ मार्च रोजी मतदान
२२ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी छाननी होणार असून, २४ फेब्रुवारी रोजी वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रकाशित होईल. १० मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. १२ मार्च रोजी निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांना निशाणीचे वाटप केले जाणार असून, २१ मार्च रोजी मतदान होऊन २३ मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.