पूर्णा : जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश लागू असताना या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ जणांवर पोलिसांच्या पथकाने २४ एप्रिल रोजी दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत साडेसात हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.
संचारबंदी असताना शहरात नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी पोलीस निरीक्षक भागोजी चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, पोलीस उपनिरीक्षक मानिक गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कोपलवार, कर्मचारी समीर पठाण, विजय जाधव, गिरीश चन्नावार यांच्या पथकाने सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील विविध भागात गस्त घातली. मुख्य बाजारपेठ, नरहरी सोनार चौक, डॉ. आंबेडकर चौक, नवा मोंढा, रेल्वे स्थानक परिसर, आनंद नगर चौक, बसस्थानक रोड याठिकाणी विनामास्क फिरणारे, भाजीपाला विक्रेते व काही दुकानदार अशा २२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.