लातूर/उदगीर : जिल्हाभरात डेंग्यू अन् चिकुनगुणियाने धुमाकूळ घातला आहे़ त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांत दहशत निर्माण झाली असून, काही लॅबचालकांकडून त्यात भर घातली जात असल्याचे निदर्शनास येत आहे़ डेंग्यू पॉझिटिव्ह नसतानाही तसा अहवाल देवून रुग्णांमध्ये भिती घालतानाच त्यांना नाहक आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे़उदगीर, देवणीसह सबंध जिल्ह्यात सध्या डेंग्यू व चिकुनगुणियाचे थैमान आहे़ त्यात चुकीचे अहवाल देवून आणखी भर ओतली जात आहे़ ताप आली की डॉक्टर्स सध्या डेंग्यू चाचणी करण्यास सूचवीत आहेत़ मात्र चाचणी करताना लॅबवाल्यांकडून काही प्रमाणात निष्काळजीपणा होत असल्याचेही समोर येत आहे़ देवणी शहरात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे़ येथील पाशामियाँ मोमीन यांची ९ वर्षीय मुलगी मदिना हिला काही दिवसांपासून ताप येत होता़ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिची गावातीलच खाजगी लॅबमध्ये डेंग्यू चाचणी करण्यात आली़ या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह देण्यात आला़ त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण रेफर केला़ परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितल्याने पाशामियाँ मोमीन यांनी आपल्या मुलीस लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले़ मात्र, याठिकाणी पुन्हा चाचणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला़ मुलीस डेंग्यू नसल्याचे या अहवालानुसार स्पष्ट झाले़ त्यामुळे हकनाक वेळ व पैश्याचा चुराडा झाला़ असे प्रकार सर्रास होवू लागल्याने रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे़४मुलीची चाचणी डेंग्यू पॉझिटिव्ह आल्याने आम्ही घाबरुन रातोरात खाजगी वाहनाने लातूर गाठले़ तेथे मात्र अहवाल निगेटिव्ह आला़ चुकीच्या या प्रकाराने पाच दिवस आपला व्यवसाय बंद ठेवावा लागला़ तसेच पैैश्याचाही चुराडा झाला, असे रुग्णाचे पिता पाशामियाँ मोमीन म्हणाले़सरकारी तपासणीच ग्राह्य़: डॉ़ पाठक४खाजगी लॅबला मान्यता नाही़ वास्तविक पाहता या लॅब अधिकृतच नाहीत़ त्यामुळे या लॅबचा अहवाल ग्राह्य धरता येणार नाही़ रुग्णांनी शासकीय रुग्णालयातच तपासण्या कराव्यात़ शासकीय अहवाल ग्राह्य धरले जातात, असे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़श्रीधर पाठक म्हणाले़
जिल्ह्यात डेंग्यूची दहशत; लॅबचे रिपोर्ट निघताहेत फसवे !
By admin | Published: September 30, 2016 1:12 AM