पाथरी (परभणी ) : येथील पंचायत समितीच्या कॉम्प्लेक्समधील बॉम्बे कलेक्शन या कापड दुकानमध्ये आज पहाटे चोरट्यांनी वरच्या मजल्याची जाळी काढून दुकानात प्रवेश केला. दुकान आणि देवाच्या गल्ल्यातील 3 लाख 42 हजार 400 रुपयाची रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथरी शहरात राष्ट्रीय महामार्ग-61 लगतच पंचायत समितीचे कॉम्प्लेक्स आहे. मुख्य रस्त्यावरच पंकज राजकुमार वैजवाडे यांचे ( रा. व्हीआयपी कॉलनी ) बॉम्बे कलेक्शन या नावाने कापडाचे मोठे दुकान आहे. 14 नोव्हेंबर रोजी रात्री वैजवाडे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. आज सकाळी 9.45 वाजता दुकान उघडल्यानंतर त्यांना दुकानात चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कापड दुकानाच्या वरच्यामजल्यावरील जाळी काढून दोन चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. आत प्रवेश केल्यानंतर लगेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर तोडून कॅमेरा फोडला.त्यामुळे पुढील घटना सीसीटीव्हीमध्ये दिसून आली नाही. दरम्यान, दुकानाच्या आणि देवाच्या गल्ल्यातून 3 लाख 42 हजार रोख रक्कम लंपास केल्याची माहिती आहे. या प्रकरणी वैजवाड यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. व्ही. गंगलवाड पुढील तपास करत आहेत.