परभणी: महाराष्ट्र सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रम परभणीमध्ये पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पार पडला. परभणीतील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात होत असलेल्या या कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक आणि विरोधकांवर जोरदार टीका केली.
परभणीच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले की, 'आमचे विरोधक सकाळपासून रात्रीपर्यंत टीका करत राहतात. सकाळी 9 वाजता एक भोंगा सुरू होतो आणि रात्री 10 वाजेपर्यंत दुसरे भोंगे सुरू असतात. आमच्यावर पाहिजे तेवढी टीका करा, आम्ही टीकेला घाबरत नाही. पण विकासाच्या मुद्द्यावर बोला.'
फडणवीस पुढे म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचे परभणीवर विशेष प्रेम आहे. येत्या काळात परभणीचे चित्र बदलेले दिसेल. परभणी शहरातले रस्ते खराब झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर खूप दूर उतरवण्यात आले. खराब रस्ते दिसावेत म्हणून दूरचा प्रवास त्यांना करवून दिला. तसे केले नसते तरी परभणीचे रस्ते तयार केले असते. परभणीमध्ये आता सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्यात येतील, असा शब्द फडणवीसांनी यावेळी दिला.
नवीन महामार्गाची घोषणायावेळी देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली. 'जसा मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग झाला, तसाच नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग करण्यात येणार आहे. या महामार्गाचा फायदा मराठवाड्याला होणार आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्याचे भाग्य उजळेल. पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशात विकासाची गंगा वाहात आहे. आता महाराष्ट्रातदेखील शेतकऱ्यांसह सर्व स्तरातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरू आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून मराठवाड्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं शेवटी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.