शहरातील जायकवाडी परिसरात राहणारे गंगाधर शंकरराव सावंत (वय ४२) हे १६ फेब्रुवारी रोजी किराणा सामान घेऊन रात्री १० वाजेच्या सुमारास घराकडे जात असतांना प्राध्यापक कॉलनीतील मारोती मंदिराजवळ असलेल्या नालीत डोक्यावर पडले. ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. रात्रभर ते त्याच जागी पडून राहिले. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी कॉलनीतील काही नागरिकांच्या लक्षात ही घटना आल्याने त्यांनी याची माहिती पोलीस ठाण्यात दिली. तेंव्हा पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सपोनि बालाजी गायकवाड, जमादार दीपक भारती, पो. ना. दत्तराव पडोळे, सुग्रीव सावंत, मूलगीर आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा बेशुद्ध अवस्थेत नालीत पडलेल्या गंगाधर सावंत याना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी मयताचे लहान भाऊ बाळू शंकरराव सावंत रा. संत जनाबाई नगर गंगाखेड यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. याचा पुढील तपास जमादार मदन सावंत हे करीत आहेत.
नालीत पडल्याने एका इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:29 AM