सोनपेठ (परभणी ) : नवरा- बायकोचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सासऱ्याचा जावयाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना १४ जुलै रोजी गंगाखेड तालुक्यातील भांबरवाडी येथे घडली असून या प्रकरणी १७ जुलै रोजी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माधव होणमने यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, फिर्यादीची बहीण इंदूबाई मुक्तीराम गेजगे ही भांबरवाडी येथे राहते. १४ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मुक्तीराम मानाजी गेजगे हे त्यांच्या पत्नी इंदूबाई यांना मारहाण करीत होते. याबाबतची माहिती इंदूबाईचे वडील मारोती होणमने (६०) यांना मिळाल्यानंतर त्यांनी मुलीच्या घरी धाव घेतली व नवरा -बायकोतील भांडण सोडवू लागले. त्यावेळी मुक्तीराम गेजगे याने ‘मी माझ्या पत्नीला मारहाण करीत आहे ’ असे म्हणत जवळच्या लाकडाने मारोती होणमने यांना गंभीर मारहाण केली. त्यामध्ये मारोती होणमने हे जमिनीवर कोसळले.
उपचारासाठी त्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत माधव होणमने यांच्या फिर्यादीवरुन आरोपी मुक्तीराम गेजगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे हे करीत आहेत. दरम्यान, सोनपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन भातलवंडे, कॉ.महेश कौठाळे, पांडुरंग काळे यांनी गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास बीड जिल्ह्यातील भुसनरवाडी (ता.पाटोदा) येथून आरोपी मुक्तीराम गेजगे यास अटक केली आहे.