गंगाखेड (परभणी ) : राहीनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, हत्याकांडाची जबाबदारी स्विकारून गृहमंत्री तथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आदी मागण्यासाठी राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघाच्या वतीने आज गंगाखेड तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
सोशल मिडियावर मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा पसरल्याने या अफवेमुळे नाथजोगी समाजातील पाच जणांना धुळे जिल्ह्यातील मौजे राहीनपाडा येथे ठेचून मारण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ आज दुपारी एक वाजता राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघाच्या वतीने डॉ. संजय बालाघाटे यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी नायब तहसिलदार यशवंतराव गजभारे यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात ऑट्राॅसिटी कायद्याप्रमाणे भटक्या विमुक्त जमातीच्या संरक्षणासाठी कायदा करावा, राहीनपाडा घटनेबरोबर इतर घटनांतील पिडितांच्या कुटुंबाचे पुर्नवसन करावे, राहीनपाडा हत्याकांड खटला जलदगती न्यायालयात चालवुन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या घटनेची जबाबदारी स्विकारून राज्याचे गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या.
मोर्चात भटक्या विमुक्त जमातील नाथजोगी, नाथपंथी, डवरी, गोसावी आदी पंथातील नागरीक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संस्थापक अध्यक्ष डाॅ.संजय बालाघाटे, प्रदेश युवा उपाध्यक्ष भाऊराव बाबर, शिवाजी वास्टर, शिवाजी शिदे, जगन्नाथ शिदे, नगरसेवक सत्यपाल साळवे, गोविंद यादव,लक्ष्मण भोळे, अभिमान भोसले, रोहिदास लांडगे, शिवाजी घोबाळे, भाऊ शिंदे, गंगाराम बाबर, सुभाष सितोळे, शिवाजी शिंदे आदींची उपस्थिती होती.