गंगाखेड (परभणी ) : लसीकरणानंतर मृत झालेल्या बालकाचा पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी शुक्रवारी(दि.९) रात्री बाहेर काढण्यात आला. या मृतदेहाचे अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
रोकडेवाडी (ता.पालम) येथील अंगणवाडीमध्ये बुधवारी (दि. ६) झालेल्या लसीकरणा नंतर दुसऱ्या दिवशी (दि. ७) दोन बालके दगावली होती. यातील राधाकृष्ण गोपाळ सकनुर या बालकाचा पुरलेला मृतदेह त्याच्या पित्याने दिलेल्या तक्रारी अर्जावरून शुक्रवारी (दि. ९) रात्री शवविच्छेदनासाठी बाहेर काढण्यात आला. या मृतदेहाचे अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात येणार आहे. यासोबतच राम निळे या बालकाच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण : पालम तालुक्यातील रोकडेवाडी येथे मंगळवारी (दि. ६) दुपारी बारा वाजेच्या सुमारास रावराजुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका बी.डी. निलेवाड यांनी रोकडेवाडी येथील अंगणवाडीत राम व्यंकटी निळे व लक्ष्मण व्यंकटी निळे ( वय एक महिना ) या दोन जुळ्या भावांना बीसीजी व पोलीओ, राधाकृष्ण गोपाळ सकनुर वय चार महिने यास पेंटावन, पोलीओ व बीसीजी, विद्या दत्तराव मखणे (वय दीड वर्ष) हिस डीपीटी बूस्टर, पोलीओ तसेच व्हिटॅमिन ए. ही लस दिली.
यातील राधाकृष्ण गोपाळ सकनुर वय चार महिने यास मंगळवारी मध्यरात्री पासुन ताप आल्याने त्याच्या पालकांनी बुधवारी (दि. ७) पहाटे त्यास परळी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषीत केले. याच दरम्यान गावातील राम व्यंकटी निळे व लक्ष्मण व्यंकटी निळे वय एक महिना या दोन जुळ्या भावांपैकी राम निळे याची प्रकृती खालावली. दोघांनाही बुधवारी दुपारी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता यातील राम निळे यास डॉक्टरांनी मयत घोषीत केले. यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली.