परभणी : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लढविलेल्या ८ हजार ७१७ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला सोमवारी होत आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार असून, दुपारी १ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
१५ दिवसांपासून ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले होते. प्रचार आणि कॉर्नर बैठकांनी ग्रामीण भाग ढवळून निघाला होता. जिल्ह्यात ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी ६७ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे उर्वरित ४९८ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण ८ हजार ७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदानानंतर आता प्रतीक्षा लागली आहे ती मतमोजणीची. तालुक्याच्या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे.
परभणी तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींपैकी ९ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या. त्यामुळे ७९ ग्रामपंचायतींत मतदान पार पडले. शहरातील कल्याण मंडमप् येथे १८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतमोजणीची प्रशासनाने जय्यत तयारी केली. रविवारी सायंकाळी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. एकूण १५० कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. १५ टेबलवर १३ फेऱ्यांमध्ये निकाल जाहीर होणार आहे. प्रत्येक टेबलवर ३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ८ टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ओळखपत्राशिवाय कोणालाही मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी स्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
पूर्णा येथे ११० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त
पूर्णा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी ११० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. एकूण १५ टेबलवर १३ फेऱ्या होणार असून, ८८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पालममध्ये ९ टेबल
तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींसाठी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. त्यासाठी ९ टेबल लावण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज आहे. मानवतमध्ये तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. ९ टेबलवर १४ फेऱ्या होतील. कोरोनाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.
जिंतूर तालुक्यात ९० ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. येथील तहसील कार्यालयात सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. २० टेबलवर ६० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, १९ फेऱ्यांमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
गंगाखेडमध्ये २४ टेबल
गंगाखेड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी २४ टेबल लावण्यात आले आहेत. येथील संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.