परभणी : अभियांत्रिकी शिक्षणातून गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय वगळण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा असून, गणिताशिवाय अभियंता कसा काय होऊ शकतो? असा सवाल करीत अभियांत्रिकीचा दर्जा खालावून बेरोजगारांची फळी उभी करण्याचा हा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया जिल्ह्यातून उमटत आहेत.
अभियांत्रिकी शिक्षणासाठी गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय अनिवार्य नसल्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या निर्णयामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, या क्षेत्रातील तज्ज्ञांनी या निर्णयाला विरोधच केला आहे. जिल्ह्यातील तज्ज्ञ मंडळींना काय वाटते? याविषयी माहिती घेतली तेव्हा सर्वच तज्ज्ञांनी या निर्णयाविषयी नाराजीचा सूर आळवला. गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय अभियांत्रिकी शिक्षणाचा गाभा आहेत. हा गाभाच काढून टाकण्याचा निर्णय झाला आहे. अभियांत्रिकीच्या उपशाखा असलेल्या सिव्हील, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, आय. टी., मेकॅनिकल या अभियांत्रिकी अभ्यासक्रमात गणित हा विषय अत्यावश्यक आहे. कोणत्याही गोष्टीचे प्रोग्रामिंग करायचे असेल तर गणित लागते. मात्र, तेच विषय रद्द करण्यात आले आहेत. हे दोन्ही विषय रद्द करताना विद्यार्थ्यांची अभियांत्रिकीची भीती दूर व्हावी, असे सांगण्यात आले. गणिताशिवाय अभियंता झालेला विद्यार्थी अशा प्रकाराने मध्येच शिक्षण सोडून देण्याची शक्यता आहे आणि अभियंता झाला तरी तो दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण काम करेल, याची खात्री नाही. त्यामुळे केवळ बेरोजगारांची फळी निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असून, अशा निर्णयामुळे अभियांत्रिकीचे तसेच गणिताचे महत्त्व कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
संशोधक नव्हे तर ऑपरेटर तयार होतील
इंजिनिअरमध्ये नवे तंत्रज्ञान विकसित करण्याचे कौशल्य असते. तो संशोधन करतो. संशोधनासाठी समस्येच्या मुळाशी जावे लागते आणि गणिताशिवाय मुळापर्यंत जाता येत नाही. त्यामुळे गणित विषय न घेता इंजिनिअर झाला तर तो केवळ ऑपरेटर बनेल. अभियांत्रिकी शिक्षणात ग्राफिक्स, कोडींगचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, गणित विषयाशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे केवळ वरकरणी विचार करून हा निर्णय घेतला, असे वाटते.
प्रा. संतोष पोपडे, गणिततज्ज्ञ
...तर या शिक्षणाचा काय उपयोग
भौतिकशास्त्र हा अभियांत्रिकी शिक्षणातील मूळ गाभा आहे. भौतिक व गणित हे दोन्ही वेगळे विषय नाहीत. भौतिकशास्त्रात अप्लाईड मॅथ्सचा वापर होतो. त्यामुळे हे दोन्ही विषय अभियांत्रिकी शिक्षणासाठी अनिवार्य आहेत. या दोन्ही विषयांशिवाय अभियांत्रिकीचे शिक्षण झाले तर त्याचा उपयोग काय? हा निर्णय घेताना काढलेली ब्रीज कोर्सेसची पळवाटही कुचकामी आहे. अशाने तज्ज्ञ अभियंते निर्माण होणार नाहीत. त्यामुळे निर्णय शैक्षणिक न वाटता राजकीय अधिक वाटतो. केवळ जागा भरण्यासाठी अशा पद्धतीचे निर्णय घेणे योग्य नाही.
प्रा. प्रशांत पाटील, भौतिकशास्त्र
कोणताही निष्कर्ष मांडायचा असेल तर त्यासाठी गणित आवश्यक आहे. एखाद्यावेळी भौतिकशास्त्रातील प्राॅब्लेम्स सॉल्व्ह करता येतील. मात्र, अभियांत्रिकीसाठी गणित आवश्यकच आहे. गणित वगळता अभियांत्रिकी शिक्षण अधुरे आहे. त्यामुळे गणित अनिवार्य ठेवले पाहिजे.
डॉ. आनंद पाथरीकर, संचालक, श्री शिवाजी अभियांत्रिकी