पाथरी (परभणी) : ओला दुष्काळ जाहीर करा, पीकविमा देण्यात यावा, या मागण्यांसाठी पाथरी तहसील कार्यालयासमोर मागील चार दिवसांपासून शेतकरी उपोषणाला बसले आहेत. आज दुपारी आक्रमक होत आंदोलकांनी अर्धनग्न होत प्रशासना विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले.
मागील काही दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. चार ही मंडळातील खरीप पिके पूर्णपणे हातची गेली आहेत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, पीकविमा तत्काळ देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकरी चार दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. आंदोलनात दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी आंदोलक आणि पालकमंत्री तानाजी सावंत यांचे दूरध्वनीवरून संभाषण झाले होते. त्यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, प्रशासन दखल घेत नसल्याने आंदोलकानी आज दुपारी अर्धनग्न होत बोंब मारो आंदोलन करत लक्ष वेधले.