परभणी : जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, या प्रमुख मागणीसाठी आ.मेघना बोर्डीकर यांनी २ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ केला आहे. या प्रसंगी जिल्हाभरातून सहभागी झालेल्या भाजप पदाधिकारी, शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या धोरणाचा कडाडून निषेध नोंदविला.
जिल्ह्यात ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सर्वच भागातील पीक बाधित झाले आहे. मात्र प्रशासनाने केवळ ३६ महसूल मंडळांनाच मदत जाहीर केली आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या या अन्यायाच्या विरोधात आ.मेघना बोर्डीकर यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजेपासून आ.बोर्डीकर यांनी उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनीही सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळसदृश्य स्थिती असताना केवळ ३६ मंडळाला मदत देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा देत सरसकट मदत देण्याची मागणी आ.मेघना बोर्डीकर यांनी यावेळी केली.
या आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, माजी आ.मोहन फड, विठ्ठलराव रबदडे, व्यंकटराव तांदळे, अभय देशमुख, मंगलताई मुदगलकर, डॉ.विद्याताई चौधरी, बाळासाहेब भालेराव, रंगनाथ सोळुंके, शरयू खेकाळे, शोभा कुलकर्णी, रमेशराव गोळेगावकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
काय आहेत मागण्याजिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट मदत द्यावी, विमा कंपनीकडे नुकसानीची नोंद न करु शकलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत, २०१८-१९ मधील दुष्काळी मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करावे, पीक कर्ज तत्काळ वाटप करावे.