परभणी : पालम ठाण्याच्या हद्दीत भोगाव शिवारातील नदीपात्रात एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाल्यावर आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. या प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पालम पोलिसांसह तपास केला असता सदरील इसमाचा मृत्यू हा घातपाताने घडल्याचे पुढे आले. नदीपात्रात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकलले असून या घटनेतील तीन मारेकरी पोलिसांनी निष्पन्न केले आहेत. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पालम तालुक्यातील भोगाव शिवारात गोदावरी नदीपात्रात एका अनोळखी पुरुषाचे प्रेत तरंगत असल्याची माहिती शुक्रवारी दुपारी पालम पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी केला. नंतर मयताची ओळख पटविण्यात आली. मयत हा सय्यद मुदस्सीर सय्यद इब्राहिम (२५, रा.उखळद, ता.परभणी) येथील असल्याचे समजले. सदरील इसम हा चार ऑक्टोबरपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. याबाबत ताडकळस ठाण्यात मिसिंगची नोंदही दाखल केली होती. या अनुषंगाने पोलिस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी सदरील मृतदेह पालम तालुक्यात कसा आला, याची चौकशी करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हा शाखा व पालम पोलिसांना दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखा व पालम ठाण्याच्या अधिकारी अंमलदारांची विविध पथके तयार करण्यात आली. मंगळवारी मिळालेल्या गोपनीय माहिती व तांत्रिक तपासातून मयतास राजेश सुभाष बागल, गणेश सतीश भुसारे व सुनील पिराजी दासलवाड (सर्व रा.उखळद) यांनी मारले असावे असे समजले. त्यावरून पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले.
भांडणाच्या रागातून केला प्रकारमयत सय्यद मुदस्सीर सय्यद इब्राहिम व त्याच्या भावाने राजेश सुभाष बागल यांच्यासोबत झालेल्या भांडणाच्या रागातून व मयत हा इतरांना नेहमी त्रास देत असे. याचा राग मनात भरून मयतास दारू पाजून त्याचा गळा दाबून त्यास बेशूध्द केले. वाहनाच्या डिक्कीत टाकून नवागड जवळील सारंगी पुलावरून नदीपात्रात फेकून दिल्याची कबुली या घटनेतील ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या फिर्यादीवरून पालम ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही आरोपींना तपास कामी ताब्यात घेण्यात आले.
यांनी उलगडला गुन्हाही कारवाई पोलिस अधीक्षक रागसुधा.आर., अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक कपील शेळके, पांडुरंग भारती, पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार, गोपीनाथ वाघमारे, कर्मचारी बाळासाहेब तुपसुंदरे, दिलावर खान पठाण, जग्गनाथ भोसले, आशा सावंत, विलास सातपुते, विष्णू चव्हाण, मधुकर ढवळे, शेख रफीयोद्दिन, निलेश परसोडे, केंद्रे, इमरान यांच्यासह पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, मारुती कारवार, जाधव, सुग्रीव केंद्रे, सायबर सेलचे स्वप्निल पोतदार, राजेश आगाशे, प्रशांत लटपटे, गणेश कौटकर यांनी केली.