गंगाखेड (जि. परभणी) : एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळविण्यासाठी पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागते. मात्र शनिवारी गंगाखेड शहरात कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका काळविटाने चक्क पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांनीही उपचार करुन त्याचे प्राण वाचवत त्याला संरक्षण दिले आणि जंगलात नेऊन सोडले. हा प्रकार शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गंगाखेड येथे घडला.
गंगाखेड शहर परिसरातील यज्ञभूमीच्या पाठीमागील भागातून काळविटीचा एक कळप जात होता. या कळपातून वाट चुकलेले एक काळवीट शहर परिसरात आले. एकट्या काळविटाला पाहून मोकाट कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला. काळविटावर हल्लाही केला. त्यामुळे सैरभैर झालेले काळविट मिळेल त्या रस्त्याने धावत होते. याच मार्गावर असलेल्या पोलीस ठाण्यात या काळविटाने आश्रय शोधला. उपचारानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास वन अधिकारी रेखा भेंडेकर यांनी पोलीस नाईक वसंत निळे, राजकुमार बंडेवार, रमेश तिडके, ओम गादेकर, पप्पू गायकवाड यांच्या मदतीने या काळविटाला जंगल परिसरात नेऊन सोडले.
पोलिसांनी केली कुत्र्यांच्या तावडीतून सुटकाकाळविट येताच पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेले पोलीस निरीक्षक वाय.एन. शेख, पोलीस नाईक सय्यद उमर, सुग्रीव सावंत, श्रीकांत कुलकर्णी, रतन सावंत, अनिल डोंगरे, होमगार्ड गोविंद मुंडे यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने धाव घेत कुत्र्याच्या तावडीतून काळविटाची सुटका केली. वन अधिकारी रेखा भेंडेकर यांच्याशी संपर्क साधून जखमी काळविटाला येथील पशूवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ.श्रीनिवास कार्ले, डॉ.मिलिंद गायकवाड यांनी त्याच्यावर तातडीने उपचार केले.