परभणी : आरोपीने पीडितेचा व स्वतःचा फोटो जुळवून समाजमाध्यमावर व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी जिंतूर तालुक्यातील बामणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने ८ साक्षीदार तपासून आरोपीस २ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा १८ जून रोजी सुनावली.
बामणी येथील रवी वसंत वटाणे याने पीडिता अल्पवयीन असल्याचे माहीत असताना गावातील एका चौकात कामानिमित्त आलेल्या पीडितेचा आपल्या मोबाइलमध्ये फोटो काढून घेतला. तो फोटो त्याच्यासोबत जुळवून समाजमाध्यमांवर टाकला. त्याचबरोबर पीडितेसोबत कोणी लग्न केले तर मी जीवाचे बरे वाईट करेल, असा मजकूर त्यामध्ये लिहिला. त्यामुळे पीडितेची बदनामी झाली. याप्रकरणी बामणी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. ज्ञानोबा दराडे यांनी एकूण ८ साक्षीदार तपासले. त्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांनी आरोपी रवी वसंत वटाणे यास दोन वर्षे सश्रम कारावास, ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तसेच दंडाची रक्कम पीडितेस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशित केले. या खटल्यात मुख्य सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. कोर्टपैरवी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संतोष सानप, पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, पोलिस अंमलदार प्रमोद सूर्यवंशी, मपोह वंदना आदोडे, सय्यद रहीम यांनी काम पाहिले.