लघु बंधाऱ्याला गेट बसवा
लिंबा : पाथरी तालुक्यातील लिंबा येथील एका ओढ्यावर १० वर्षांपूर्वी लघु सिंचन विभागाने उभारलेल्या लघु बंधाऱ्याला १० वर्षांपासून गेट बसविण्यात आले नाही. त्यामुळे ५० एकरवरील सिंचन रखडले आहे. याकडे जि.प. प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ या बंधाऱ्याला गेट बसवावेत, अशी मागणी आहे.
जिल्ह्यातील क्रीडा संघटना नावालाच
परभणी : जिल्ह्यातील खेळाडूंना भौतिक सुविधांसह वेगवेगळ्या खेळांचे प्रशिक्षण व त्यांच्या अडीअडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी क्रीडा संघटनांची, असोसिएशनची उभारणी केली जाते. परभणी जिल्ह्यात जवळपास ७१ संघटना, असोसिएशन कार्यरत आहेत. मात्र, नऊही तालुक्यांत अद्यापपर्यंत क्रीडांगण नाही, याबाबत या संघटना चुप्पी साधून आहेत.
तक्रारदार वाऱ्यावर
परभणी : निकृष्ट दर्जाचे सोयाबीनचे बियाणे दिल्याच्या जिल्ह्यात १२ हजार ५०० शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असून त्यातील ११ हजार ५०० शेतकऱ्यांच्या तक्रारींचे पंचनामे कृषी विभागाने केले आहेत. असे असले तरी अद्याप त्यांना मोबदला देण्याच्या अनुषंगाने कुठलाही धोरणात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे.
देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष
परभणी : दुष्काळाच्या अनुषंगाने महत्त्वाची असलेली पिकांची आणेवारी ठरवीत असताना पडलेल्या पावसाची नोंद ज्या पर्जन्यमानक यंत्राद्वारे घेतली जाते. त्या पर्जन्यमानक यंत्राकडेच महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.
शस्त्रक्रिया थांबल्या
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रिया थांबल्या असल्याने रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गरीबच नाही तर सर्वसामान्यांसाठी आधार ठरलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या वतीने नेत्र विभागासाठी स्वतंत्र इमारत शहरातील शनिवार बाजार परिसरात उभारण्यात आली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेत्र शस्त्रक्रिया अद्यापही सुरळीत झाल्या नाहीत.
परसबागेतून सेंद्रिय शेती
परभणी : महाराष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियान (उमेद) अंतर्गत महिला स्वयंसाहाय्यता समूहाच्या माध्यमातून जिल्ह्यात ठिकठिकाणी परसबाग तयार करण्यात आली आहे. या परसबागेमध्ये औषधी वनस्पती, पालेभाज्यांची लागवड केली जाणार आहे. या भाज्यांचा फायदा नागरिकांना होणार आहे.